मुंबई- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. सध्या एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. मात्र महायुतीतील चर्चा अद्याप संपलेली नसल्याने सत्ताधारी पक्षांमधील समन्वयावर विरोधकांच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, यातच आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्री कोण?
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. विविध पक्षाचे वेगवेगळे नेते या बाबत दावे करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले असल्याची माहिती एका ज्येष्ठ भाजपच्या नेत्याने ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढली असून त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याची कारणे-
▪️युतीत समन्वयाची क्षमता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हँडल करू शकणारा एकमेव नेता म्हणून फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले जाते. या दोन्ही पक्षावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
▪️आरएसएसही अनुकूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अनुकूल असल्याने भाजप पक्षातून विरोधाचा प्रश्न नाही. संघाचा विश्वासू नेता म्हणून फडणवीस यांची ओळख आहे. नागपूर मधील संघाच्या मुख्यालयतून फडणवीसांवर विश्वास व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे यात संघांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
▪️नेतृत्वाला कौल देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपला राज्यातील निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे. जनमत देखील त्यांच्याच बाजूने असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरुच आहे. जनतेने त्यांनाच कौल दिल्याने त्यांची या पदावर वर्णी लागणे क्रमपात्र मानले जात आहे.
▪️मोदी-शाह अनुकूल देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील अनुकूल आहेत. या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारातही त्यांच्या नावाचे संकेत दिले होते. त्यामुळे फडणवीस यांच्या नावाला भाजपमधून दुसरे कोणी विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.