विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार न्यायालयात जाणार आहेत.
*पुणे :* राज्यातील विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. या निकालानं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला, तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकट्या भाजपानं 132 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आलेला नाही. आता ईव्हीएम विरोधात लढाईसाठी विरोधक एकवटले आहेत. अश्यातच आज (27 नोव्हेंबर) पुणे शहरातील तसंच जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विविध मतदारसंघातील पराभूत उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
*पराभूत उमेदवारांची बैठक :*
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची पुण्यातील राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक निकलाबद्दल चिंता आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. या बैठकीत ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे, ई.व्ही.एम. मशीन तज्ञ माधव देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी प्रशांत जगताप, रमेश बागवे, अशोक पवार, दत्ता बहीरट, रमेश थोरात, अंकुश काकडे, अभय छाजेड, संजय मोरे त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील, अजित गव्हाणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, अश्विनी कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*निकालाबाबत तीन स्तरावर लढा देण्याचं निश्चित :*
यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत तीन स्तरावर लढा देण्याचं निश्चित करण्यात आलं. “वी.वी. पॅट मोजणीसाठी तत्काळ अर्ज देण्यात यावा, निवडणुकीच्या निकालासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करण्यात यावी, तसंच या निवडणुकीच्या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार,” असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.