*संगमेश्वर/ प्रतिनिधी-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबवली नं 2 , ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75वा भारतीय संविधान दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रभातफेरी काढून घर घर संविधान विषयी जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी मदतनीस, पालक, अंगणवाडीचे विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील शिक्षिका सौ. सावंत मॅडम यांनी मुख्याध्यापक सन्मा. सावंत सर, सन्मा. खळे सर व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान प्रास्ताविकेचे प्रकटवाचन कऱण्यात आले.
संविधान म्हणजे काय? भारतीय संविधानाची निर्मिती या विषयी शाळेतील शिक्षक श्री.खळे सर यांनी आपले विचार मांडले.संविधान सभा, मसुदा समिती, संविधान निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचें योगदान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या विषयी शाळेतील शिक्षिका सौ. सावंत मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री. सावंत सर यांनी संविधान उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले. संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शेवटी सौ. सावंत मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.