भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता:शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात पुन्हा 2019 चा घटनाक्रम…

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, असा शब्द भाजपने शिंदे यांना दिल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा 2019 चा घटनाक्रम घडत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. पण अद्यापही महायुतीला आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता आला नाही. भाजपने यावेळी महाराष्ट्राला आपला मुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे कथितपणे नाराज झालेत. यामुळे सरकार स्थापन करण्याचा पेच फसला असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना उपरोक्त दावा केला आहे.

TOI च्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्राला जोरदार झटका बसला होता. महायुतीला तेव्हा केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली तर तुम्हालाच मुक्यमंत्रीपद दिले जाईल असा स्पष्ट शब्द भाजपने दिला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या नेत्याने केला आहे.

नेमका काय म्हणाला शिवसेनेचा नेता?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. या बैठकांत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. त्यात भाजप विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवेल, त्या खालोखाल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढवतील. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल. त्या स्थितीत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील याचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे या नेत्याने म्हटल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

2019 मध्ये काय घडले होते?

शिवसेना नेत्याच्या या वृत्तामुळे महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीचे कारणही समोर आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 मध्येही शिवसेना व भाजपमध्ये असाच घटनाक्रम घडला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपश्रेष्ठींवर मु्ख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचा व त्यानंतर त्यापासून माघार घेतल्याचा आरोप केला होता.

अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही भाजपवर त्याच प्रकारचा आरोप करताना दिसून येत आहे. त्यामु्ळे महायुतीमधील शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page