देवरूख- लाखो रुपये खर्च करून देवरुख ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे मात्र ही इमारत केवळ शोभेसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने अती जोखीम असलेल्या गरोदर मातांना रत्नागिरी अथवा संगमेश्वर येथे हलवावे लागते. तर सोनोग्राफी सेंटरमधील मशीन उपलब्ध झाले आहे परंतु हे मशीन चालविण्यासाठी तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मशीनचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे इमारत जरी नवीन असली तरी आजही रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काही महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात उद्धाटन करण्यात आले. परंतू इमारत नविन असली तरी सुविधांबाबत अजूनही पूर्वीची परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणे सोयीचे होते. इमारत नविन झाल्यानंतर येथे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज २०० रुग्णांवर उपचार केले जातात. तर दररोज बुधवारी ४० गरोदर मातांची तपासणी केली जाते. सध्या देवरूख रुग्णालयासाठी तीन वैद्यकिय अधिकारी पदे मंजुर आहेत. परंतु यातील दोन पदे भरण्यात आली आहेत. तर एक रिक्त आहे. यातील एक डॉक्टर हे कंत्राटी स्वरूपाचे आहेत. तर सन 2014 पासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी असलेल्या डॉक्टरांकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे.
देवरूख ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे रुग्णांची तपासणी केली. सद्या असलेल्या दोन डॉक्टरांमार्फत रुग्णांवर उपचार केले जातात. परंतू त्यांना अवघड होते. तर स्त्रीरोग तज्ञ नसल्याने गरोदर महिलांची प्रसूती करण्याचे कामही याच डॉक्टरांना करावे लागते. तर अती जोखीम असलेल्या गरोदर मातेला रत्नागिरीत हलवावे लागते. देवरूख रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध झाल्यास येथेच उपचार मिळणे सोयीचे होईल. देवरूख रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतू यासाठी तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही रुग्णांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. सोनोग्राफी सेंटर सुरू झाल्यास खाजगी रुग्णालयात जाऊन रुग्णांना सोनोग्राफी करावी लागणार नाही. त्यामुळे रुग्णांना होणारा खर्च कमी होईल. रुग्णालयात नियमीत तपासणी बरोबरच अन्य उपक्रमही राबविण्यात येतात.