मुख्यमंत्री आमचाच:बाजारात तुरी अन् पदासाठी मारामारी!, भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाचा मुख्यमंत्रिपदावर दावा…

Spread the love

मुंबई- विधानसभा  निवडणुकीच्या  मतदानानंतर जाहीर झालेल्या १० पैकी ७ एक्झिट पोलने महायुतीचे तर ३ पोलने महाविकास आघाडीचे सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याच्या आधीपासूनच महायुती – आघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची स्पर्धा लागली. त्यामुळे निकालापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे.

महायुतीचे प्रमुख नेते मात्र पुढची रणनीती ठरवण्यात व्यग्र होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी ठाण्यात व ‘वर्षा’ बंगल्यावर बसून संभाव्य निकालाचा आढावा घेतला. विजयाची खात्री असलेल्या अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क साधून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून भाजप उमेदवारांशी फाेनवर संपर्क साधत माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही बारामतीतच तळ ठोकून होते. महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले तर आपली भूमिका काय असावी, याची व्यूहरचना अजित पवारांनी सुरू केली आहे. शिंदे गटाचे नेतेही शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी रणनीती आखत आहेत.

भाजपची दिल्लीत बैठक-

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी महाराष्ट्र व झारखंडच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर काय पावले उचलायची याची माहिती दोन्ही राज्यांच्या नेत्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेचा दावा केला नाही तरच राष्ट्रपती राजवट

२६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर काय?

२६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपतेय. त्यामुळे निकाल लागताच निवडणूक अधिकारी अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे देतील. त्यानंतर राज्यपाल अधिसूचना काढतील. २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन विधानसभा गठित करावी लागेल.

२६ पर्यंत सरकार झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल ?

विधानसभा गठित करणे व सरकार स्थापन करणे वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. २६ नोव्हेंबरपर्यंत विधानसभा गठित होईलच. त्यानंतर राज्यपाल मोठ्या पक्षाला आमंत्रित करतील. बहुमताअभावी कुणी सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकेल. ती अल्पकाळच असेल. जेव्हा बहुमतातील युती- आघाडी पुढे येईल तेव्हा ते सरकार स्थापन करतील व राजवट संपुष्टात येईल.

नवे सरकार स्थापनेची प्रक्रिया कशी असेल?

१५ वी विधानसभा स्थापन झाल्यानंतर, बहुमत असलेला पक्ष राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करतील. विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरी पत्रांसह करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांना राज्यपाल सरकार स्थापनेस आमंत्रित करतील. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सरकार राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याची विनंती करतील. विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी होईल त्यानंतर बहुमत सिद्ध करावे लागेल.

किती दिवसात सरकार स्थापन करावे लागेल ?

२६ नोव्हेंबरनंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया करावी लागेल. १९९९ साली छगन भुजबळांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यावेळी देान महिन्यानंतर सरकार स्थापन झाले होते. बहुमत मिळालेल्या पक्षाने दावा केल्यानंतरच सरकार स्थापन होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page