महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी:देवेंद्र फडणवीसांचे डहाणूच्या सभेत मोठे आश्वासन….

Spread the love

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणू येथील सभेत बोलताना मोठे आश्वासन दिले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले, तर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी डहाणूच्या विकासाबाबतही भाष्य केले. वाढवण बंदरामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच डहाणूचा विकास करताना नैसर्गिक संपदा आणि जैवविविधतेवर गदा येणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वाढवणच्या बंदरामुळे डहाणू भागाचे चित्र बदलेल. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही. पण आहे त्यापेक्षा चांगली अवस्था आम्ही तुम्हाला आणून देऊ. हा देवाभाऊचा शब्द आहे. तुमच्या पारंपारिक व्यवसायाला नवी उंची कशी मिळेल. याची योजना आम्ही आखली आहे. त्यामुळे पुढील काळात कोळी बांधव समृद्ध झालेले पहायला मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते डहाणू येथे प्रचार सभेत बोलत होते. अनेकांनी वाढवण बंदराला विरोध केला होता, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला

आदिवासींची नैसर्गिक संपत्ती कुणालाही देणार नाही…

भगवान मिरडा मुंडांना मानणारे आम्ही आहोत. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरडा मुंडांची जयंती आहे. संपूर्ण भारतात ही १५० वी जयंती एक वर्षापर्यंत साजरी करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले असल्याचे फडणवीस म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊन डहाणू आणि पालघरच्या आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन कुणालाही घेऊ देणार नाही, असे आम्ही ठरवल्याचेही फडणवीस म्हणाले.

1991 च्या नोटिफिकेशनमुळे डहाणूचा विकास रखडला…

फडणवीस म्हणाले, शहर वाढत आहे. शहरांच्या गरजा आणि लोकसंख्या वाढत आहे. विकासाची गरज आहे. मात्र, 1991 च्या नोटिफिकेशनमुळे डहाणूचा विकास रखडल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही त्या नोटिफिकेशनच्या विरोधात नाहीत. त्यातील पर्यावरणवादी विषयाला आमचेही समर्थन आहे. पण, 1991 आणि 2024 मध्ये वस्तुस्थिती, नियम आणि टेक्नॉलॉजी बदलली आहे. त्यामुळे 1991 च्या परिपत्रकामुळे डहाणूच जो विकास थांबला आहे, जीव गुदमरत आहे, त्यातून डहाणूला मोकळे करण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विकास करताना नैसर्गिक संपदेवर गदा येणार नाही…

डहाणूचा विकास करताना येथील नैसर्गिक संपदा, जैवविविधता यांच्यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही. सामान्य माणसाचे जीवन कसे सुकर करता येईल, असा आमचा प्रयत्न असेल. वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. या संधी भूमिपुत्रांना मिळायला हव्यात, यासाठी भूमिपुत्रांचे स्कील डेव्हलपमेंट करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळात भूमिपुत्रांच्या हाताला काम दिले जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

पालघरला विमानतळ बांधणार…

आशियातील सर्वात मोठे बंदर डहाणूमध्ये होणार आहे. बुलेट ट्रेन या भागातून जाणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड देखील विरारपर्यंत आणतो आहोत. नरीमन पॉईंटपासून विरारपर्यंत केवळ 35 ते 40 मिनिटांत येता येईल. या कोस्टल रोडसाठी जपानमध्ये गेलो होतो. जपानमधील सरकारने 54 हजार कोटी रुपये देण्याची कबुली दिली. त्यामुळे मुंबई पालघरला जोडले जात आहे. एकीकडे रस्ता, दुसरीकडे रेल्वे, तिसरीकडे बंदर आहे. आता फक्त विमानतळाची कमतरता आहे. आता या भागात नवीन विमानतळ देखील बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी घोषणा केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page