देवरूख- इंडोनेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडोरेन्स वर्ल्ड चॅम्पियन्स आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावची सुकन्या व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली कु. ज्येष्ठा शशांक पवार या चिमुकलीने भारतातर्फे प्रतिनिधित्व करत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या सुवर्ण कामगिरीबद्दल तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ज्येष्ठाचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे हे असून तिचे आजोळ वाशीतर्फ देवरुख हे आहे. साहजिकच ज्येष्ठाच्या या आंतरराष्ट्रीय यशाचे नाते संगमेश्वर तालुक्याशी जोडले गेल्याने दोन्ही गावांमध्ये त्याबद्दल विशेष आत्मीयता निर्माण होऊन चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. तिने केलेल्या चमकदार कमगिरीबद्दल विविध स्तरावरील व्यक्तींनी बॅनर अथवा सोशल मीडियावर विविध पोस्टद्वारे आपल्या शुभेच्छा प्रसारित केल्या आहेत. ज्येष्ठाच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत थेट मातोश्री येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते नुकताच तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी ज्येष्ठाचे आई वडील व माजी मंत्री सचिन आहिर हे उपस्थित होते.
अल्पकालावधीत स्केटिंगचे सर्वोत्तम कौशल्य अवगत करणाऱ्या ज्येष्ठाने 0.20 ,1.0 आणि 2.0 अशा सर्व प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. काहीशा दुर्लक्षित अशा स्केटिंग सारख्या कठीण खेळात विशेष नैपुण्य आत्मसात करत भारताला मिळवून दिलेल्या या अभूतपूर्व यशासाठी तिचे देशभरातुन कौतुक होत आहे. कोणत्याही खेळाची अत्युच्च कौशल्ये साध्य करण्यासाठी लागणारी कठोर मेहनत आणि मानसिक एकाग्रता यात तिने केलेली प्रगती तोंडात बोटं घालायला लावण्या इतकी आश्चर्यकारक आहे. दादरच्या हिंदू कॉलनीतील ओरायन इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या ज्येष्ठाने केवळ आवड म्हणून स्केटिंग खेळायला सुरुवात केली. हळूहळू या खेळातील तिची प्रगती लक्षात घेता मुंबईच्या स्पीड एक्स स्केटिंग अँकॅडमीचे मेहमूद खान यांनी तिच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. बघता बघता तिने जिल्हा राज्य व राष्ट्रीयस्तरावर चमक दाखवली. स्केटिंग मधला तिचा हा विस्मयकारक प्रवास तिला त्याच वेगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेला आहे. तिने बालवयातच उत्तुंग झेप घेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचे संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.