नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्वान, कर्तुत्ववान गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला!…
धुणी, भांडी करणारी महिला बनली हॉटेल मालक!
जन्मापासून गरिबी त्यामुळे शिक्षण कमी पण कष्ट सातत्य व जिद्दीने मंजिरी दळी झाल्या यशस्वी!
काही स्त्रिया लहानपणापासूनच काही गोष्टींमुळे सोशिक, पण तितक्याच कष्टाळू, जिद्द, प्रामाणिक, आणि दगडालाही पाझर फोडणाऱ्या आहेत. गरिबीतील बालपण, शिक्षण, वडील दारुने व्यसनी, भुकेसाठी अन्नाची विवंचना, मग काय करावे? असे समोर धूसर दिसत असतानाही गरिबीतून मार्ग काढायचाच
अशी मनाशी खरी खून गाठ मारून म्हणजे प्रतिज्ञा करून समाजातील काही महिला आपली नेकीने वाटचाल सुरू करतात. व कष्टाचा डोंगर उपसत ,उपसत नेकीने पुढे जाण्याची प्रयत्न करतात. अशाच वर्णनाशी मिळत्या जुळत्या असलेल्या कष्टाळू महिला भगिनी म्हणजे मंजिरी गांधी उर्फ मंजिरी शेखर दळी !
गुहागर तालुक्यातील कोतळूक सारख्या खेडेगावात अगदी खूपच गरीबीत मंजिरी यांचा जन्म झाला. घरी वडील दारूने व्यसनी, एकटी आई कष्टाने काहीतरी काम करून कमवणारी, त्यामुळे घरात अठरा विश्व दारिद्र्य म्हणावे लागेल. अशी परिस्थितीत मंजिरी जेमतेम इयत्ता तिसरी पर्यंतच नाममात्र शिकल्या. शिक्षण खर्चासाठी घरी आर्थिक काही उपाय नसल्याने इयत्ता तिसरी नंतर आई बरोबर मजुरीकाम, धुणी,भांडी करणे, अशी कामे न लाजता सुरू केली. त्यात भावंडे एकूण तीन! मग कोणी शिकावे? असा प्रश्न असल्याने शेजारीपाजारी घर कामे करणे अगदी लग्न होईपर्यंत चालू होतें.
मंजिरी ताईंचा संगमेश्वरातील शेखर दळी यांच्याशी विवाह झाला. या सासरच्या घरी ही गरिबीच होती. पती संगमेश्वर मधील प्रभाकर ट्रेडर्स या दुकानात नोकर म्हणून सुमारे २०/२२ वर्षे कामाला होतें. पण तेथेही तुटपूजा पगार असल्याने त्यांना जोड द्यावी म्हणून त्या दरम्यान हॉटेल गणेश कृपा यामध्येही सायंकाळी ५ ते रात्री बारा वाजेपर्यंत मंजिरी यांनी न लाजता काही वर्षे काम केले . तसेच घरी पापड, लोणचे, घरगुती पदार्थ, इडली, वडे, भजी, पुरणपोळी, अशा नास्ता ऑर्डर,घेऊन व्यवसायाच्या दिशेने वाटचाल सुरू करू लागल्या. त्यानंतर कडवई व संगमेश्वर आठवडा बाजारात जाऊन पदार्थांचे दुकान मांडून पदार्थ विकू लागल्या. यासाठी कोणतीही लाज किंवा संकोच त्यांनी मनात कधीच ठेवला नाही.
परंतु आठवडा बाजारात गर्दीतील कमी जागा, रखरखते दिवसभराचे ऊन यामुळे आठवडा बाजारात बंद करून संगमेश्वर देवरुख रोड पुलाजवळ एक हात गाडी सुरू केली. वडा भजी चहा विकण्याचे काम सुरू केले. पहाटे लवकर उठून हात गाडीचा रात्री नऊ वाजेपर्यंत व्यवसाय रस्त्याच्या कडेला चालू असायचा. अशी पाच सहा वर्षे गेली , व एके दिवशी एका लक्झरी गाडीवरील चालकाचा ताबा सुटून या हात गाडीवर लक्झरी धडकून हात गाडी पूर्ण नष्ट झाली. व हा कमाईचा पर्याय थांबला. त्यानंतर काही दिवस मंजिरी घरीच होत्या. नंतर संगमेश्वरातील व्यापारी आप्पा मयेकर यांनी सुचवले की तात्पुरती हातगाडी हॉटेल स्वरूपात अमुक अमुक जागेत चालू कर. त्याप्रमाणे ही हात गाडी पुन्हा सुरू केली. असे करता करता लक्षात आले की छोटसं हॉटेल करावं. याकरता प्लास्टिक, भिंगार्डेच्या जुन्या खिडक्या, दरवाजे व इतर लाकडे आणून बसवले व एक साधं सुधं हॉटेल सुरू केले.
या हॉटेलमध्ये पहिल्या दिवशी एका पिशवीच्या दुधाने सुरुवात केली ,आता जवळपास वीस पिशव्या लागतात.तसेच एका पाव लादीने केलेली सुरूवात आता पंधरा,वीस लाद्या अगदी सहज लागतात . तसेच स्टोव्हवरील चहाला उशीर व्हायचा म्हणून गिऱ्हाईक निघून जायचे.
त्यासाठी हळूहळू गॅस शेगडी घेतली. त्यानंतर थोडा बदल करून संगमेश्वरला ” दळी तर्री मिसळ ” या नावाने हॉटेल सुरू केले.
तर्री म्हणजे मिसळचा झणझणीत लाल कट! यामुळे गिर्हाईक वाढत गेले. त्यावर जम बसवत हळूहळू दोन्ही वेळची “जेवण माळी” सुरू केली. त्यामुळे आता हा धंदा चांगला जम घेत असून यासाठी माझे पती शेखर, तसेच मुलगा ओमकार यांचे मला सहकार्य मिळत आहे . एका स्त्रीने चालू केलेला हॉटेल व्यवसाय आम्ही तिघे व दोन सहकारी माणसे अशी एकूण पाच जण नेहमी काम करतो. आता हॉटेलमध्ये जम बसला आहे त्यामुळे या व्यवसायातील आत्मविश्वास व अनुभव वाढला आहे आम्ही कुटुंबीय या धंद्याकडे अजूनही आत्मविश्वासाने झोकून देऊन गिर्हाईकाला पदार्थाची चव पसंतीला उतरवून त्यांचे समाधान करत आहोत.
सध्याची आमच्या कुटुंबाची परिस्थिती कर्ज न घेता खाऊन पिऊन सुखी व समाधानी आहोत. तसेच घरच्या कामात सुन अंकिता हिचेही चांगले सहकार्य मिळत आहे. अशाही परिस्थितीत कोरोना सारख्या काळात व आजही गरजू लोकांना वेळेला जीवनावश्यक वस्तू स्वखुशीने देत आहोत.
आयुष्यात किती कष्टाच्या खस्ता सोसल्या तर आत्मविश्वासाने , जिद्द व कष्टाच्याच जोरावर स्त्री किंवा कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते. पण त्यासाठी लागतो तो धीर तसेच हवा असतो तो सोशिकपणा व आत्मविश्वास!
*▪️लेख शब्दांकन/श्रीकृष्ण खातू /धामणी /संगमेश्वर/मोबा.नं. ८४१२००८९०९*