रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी तसेच स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे. शिस्त म्हणून जीवनात ती अंगीकारायला हवे. मूलभूत अधिकार म्हणून स्वच्छतेला महत्व द्या, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा प्रशासन आणि प. पू.स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिरादार, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, माजी सभापती कुमार शेट्ये, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या शालेय जीवनातील स्वच्छतेविषयक प्रसंग सांगून ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे महत्त्व आपणा सर्वांना सांगितले आहे. शालेय जीवनात शिक्षकांनी सांगितलेले स्वच्छतेचे महत्त्व आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक व्यक्तींनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास, देश आपोआप स्वच्छ राहील. या स्वच्छतेमध्ये कायम सातत्य असावे. त्यामुळे परिसर, आपले गाव आणि पर्यायाने आपला देश स्वच्छतेत अग्रेसर असेल. परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांच्या देशासाठी शिस्तीचे पालन करतो. स्वच्छतेला महत्त्व देतो. तसेच आपण आपल्या परिसरात, आपल्या गावाला, देशासाला स्वच्छतेसाठी महत्त्व दिले पाहिजे.
स्वामी बाळ सत्यधारी महाराज यावेळी म्हणाले, शरीर हे एक मंदिर आहे. त्याची पूजा करायला हवी. अंधश्रध्दा, व्यसन यापासून दूर रहायला हवे. आपण मनुष्य बनले पाहिजे. पुढच्या पिढींसाठी अशाचप्रकारे मार्गदर्शन करायला हवे. यावेळी पर्यावरणपूरक दैंनदिन जीवन व्यतीत करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर परिसराची उपस्थितांनी स्वच्छता केली.