रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. 72 तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला हवेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सोमेश्वर, टिकेगाव, चांदेराई आणि हरचिरी या गावातील कुटुंबाना भेट दिली. यावेळी राहूल पंडीत, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी ज्या महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, त्या प्रकरणांबाबत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या गावभेट कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महिला भगिनिंना व्यवस्थित मिळतो की नाही, हे पाहण्यासाठी मी आज आलोय. ही योजना सर्व जात, धर्माला घेऊन जाणारी, आर्थिक ताकद देणारी आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. उलट भविष्यात पंधराशेमध्ये वाढच होईल. तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे पाहून, तुमच्या चेहऱ्यावरील झालेला आनंद पाहून, आज मला खूप समाधान वाटले.
लखपती दिदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५४ हजार महिलांना लखपती बनवायचे आहे. या योजनेसह लेक लाडकी, तीर्थ दर्शन, वयोश्री या योजनांचा लाभही सर्वांनी घ्यावा. महिला भगिनिंच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमचे समाधान आहे. या योजनेत एकही पात्र महिला वंचित राहणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे पूर्ण करुन घ्यावीत. त्रुटी दूर कराव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.
औषधोपचाराची सोय झाली – सरीता भितळे
सोमेश्वर येथील सरीता भितळे या लाभार्थी महिलेच्या घरी पालकमंत्र्यांनी भेट देऊन, विचारपूस केली. त्यावेळी श्रीमती भितळे म्हणाल्या, माझ्यावर उपचार सुरु आहे. त्यासाठी महिन्याला औषधे घ्यावी लागतात. हे सरकार माझ्या भावांचे आहे. माझ्या भावांनी आणलेल्या या योजनेचा मला आता औषधोपचारासाठी सोय झाली आहे. महिन्याला लागणारे औषधं यातून मी घेत आहे.
मिळालेल्या पैशातून गणेशोत्सव कुटुंबासह साजरा करण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर कुटुंबाच्या खर्चासाठी हातभार लागल्याची प्रतिक्रियाही अन्य महिलांनी यावेळी व्यक्त केली.