*रत्नागिरी :* फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या घोषणा होत आहेत. हे काय सुरू आहे, याचा तपास करण्यासाठी प्रातिनिधीक म्हणून कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. मिर्या गावात थेट नोटिसा आल्या. येथे वारस तपास केलेला नाही. आता बोंबाबोंब झाल्यानंतर धावाधाव सुरु झाली आहे, असे गंभीर आरोप माने यांनी केले आहेत.
पत्रकारांशी बोलताना माने यांनी सांगितले की, रत्नागिरीतल्या मतदाराला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे वरिष्ठांना कळवले आहे. मी मिर्याचा सुपुत्र आहे, माजी मंत्री पी. के. सावंत यांचा वारसदार आहे. १०५ आमदार असणार्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, ग्रामस्थांना विश्वासात न घेता एमआयडीसीची घोषणा झाली आहे. मिर्यामध्ये वनौषधी आहेत, लॉजिस्टिक पार्क सोयीचे नाही. भारती शिपयार्ड कंपनी बंद पडली होती तेव्हा काळजी घेतली गेली नाही. आज जे. के. फाईल्स बंद झाली. निवडणूक जाहीर झाली की घोषणा केल्या जातात, असे आरोप त्यांनी केले आहेत.