रत्नागिरी, दि. 31 (जिमाका) : श्रीमान हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघूनाथ माशेलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणे या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर आणि ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
शालेय मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक वृत्तीला चालना देण्याच्या अनुषंगाने याठिकाणी सायक्लाॕइड, ब्लॕक होल, आॕन द रेल्स, अँटी ग्रॕव्हीटी डबल कोन, स्नेक पॕटर्न पेंड्युलम, प्रॕक्सीनोस्कोप इमेज मल्टीपीलर, फनी मिरर्स, क्रीया-प्रतिक्रिया, लाईफ युवरसेल्फ चे माॕडेल्स याठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. उपस्थितांनी या माॕडेल्सची पहाणी केली.
निवांतपणे हे सर्व तारांगण व येथे ऑर्ट गॅलरी, सायन्स गॅलरी बघण्यासाठी यायला हवे. फारच छान. खूपच सुंदर बनविले आहे, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली.
मुलांना वैज्ञानिक जगताची ओळख व्हावी, यासाठी अॕस्ट्राॕनाॕमी गॅलरी येथे साकारण्यात आली आहे. ज्यामध्ये तारांगणातील ग्रहांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. रॉकेटची प्रतिकृती, अंतराळवीर यांच्या सूटची प्रतिकृती येथे तयार करुन ठेवण्यात आलेली आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. रघूनाथ माशेलकर, पद्मश्री नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे, पालकमंत्री श्री. सामंत यांनी तारांगणमध्ये नासा व इस्त्रो येथे गेलेल्या मुलांसमवेत मल्टीमीडिया शो बघितला. तसेच मुलांसोबत संवाद साधला. पालकमंत्री श्री सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन दिल्यानेच या सर्वसामान्य घरातील मुलांना नासा व इस्त्रो येथे पाठविणे शक्य झाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.