हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या मुंबईतल्या भेटीचा फोटो आला समोर, पडद्यामागे काय घडतंय?…

Spread the love

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया देखील दिली. पण हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची आज पहिल्यांदा भेट झालेली नाही. तर काही दिवसांपूर्वी मुंबईत या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यांच्या मुंबईतील भेटीचा फोटोदेखील समोर आला आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या मुंबईतील भेटीचा फोटो समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात आज पुण्यात बैठक पार पडली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर शरद पवार यांच्यासोबत संस्थेबाबत चर्चा करण्यात आली. राजकीय विषयावर चर्चा नव्हती, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, तुम्ही निवडणूक लढा, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?..

“माझी आज शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. आम्ही अडीच-तीन वर्ष सोबत होतो. काही विषय होते, पण आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आमची जी चर्चा झाली होती, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी अशी आमच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस इंदापूरबाबत जो निर्णय घेतील तो आपल्यालामान्य असेल. त्यामुळे आम्ही आता वाट बघतोय की, देवेंद्र फडणवीस इंदापूरबद्दल काय निर्णय घेतात”, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?…

“कोण कुणाची भेट घेतं आहे, याकडे जाऊ नका. भारतीय जनता पार्टी खूप मजबूत आहे. भारतीय जनता पार्टीत खूप मोठ्या प्रमाणात लोक आज प्रवेश करत आहेत. गेल्या आठवड्यातही मोठ्या प्रमाणात प्रवेश केला होता. त्याआधीच्या आठवड्यातही मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रवेश केला होता. पुढेही खूप प्रवेश होणार आहे. निवडणुकीच्या काळात हे खरं आहे की, काही इकडचे तिकडे जातात किंवा तिकडचे इकडे येतात. पण मला विश्वास आहे, हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर सर्व आमचे नेते असतील, ते आमच्यासोबतच राहतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page