३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं…..

Spread the love

मुलांना शाळेला सुट्टी लागली की कुठे फिरायला जायचं, कोणत्या समर कॅम्पला जायचं याचं नियोजन सुरू होतं. हे सगळं ठिक असलं तरी पालक म्हणून आपणही मुलांना थोडा वेळ द्यायला हवा. नुसताच वेळ नाही तर त्या वेळात मुलांना काही कौशल्ये जरुर शिकवायला हवीत.  दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारी ही कौशल्ये तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर शिकवाल तेवढ्या लवकर तुमच्या मुलांना त्या कौशल्यांची सवय लागेल, मुलं स्वतंत्र व्हायला त्याची निश्चितच मदत होईल. ही कौशल्ये आत्मसात केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल. साधारण ३ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना काही किमान कौशल्ये कोणत्या पद्धतीने शिकवू शकता याविषयी…

१. भाषा आणि संवाद कौशल्य…

भाषेचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या वयातील मुलं साधारणपणे खूप चीडचीड करतात, ओरडून बोलतात, किंवा खूप कमी बोलतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक करताना दिसतात. मग या सुट्टीमध्ये मुलांच्या भाषा कौशल्यावर थोडं जास्त लक्ष द्या. नवीन गोष्टी वाचणं, एखाद्या स्थळाबद्दल माहिती घेणं, चित्र काढून त्याबद्दल बोलणं अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्ही भाषा कौशल्य वाढवण्यासाठी करू शकता.

२. स्वत: ची काळजी घेण्याची कौशल्ये…

साधारण ३ वर्षानंतरची मुलं वेग वेगळ्या पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. कपडे घालणे, आंघोळ करताना साबण लावणे, अंगावर पाणी घेणे, शू-शी स्वत:ची स्वत: करता येणे. स्वतःच्या हाताने जेवण करणे, घरामध्ये लहानसहान कामात मोठ्यांना मदत करणे अशी कामं मुलं करू शकतात.

३. संज्ञानात्मक कौशल्ये…

मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे समस्या सोडवणे. आता, पालकांच्या दृष्टीने मुलांना कसली आलीये समस्या? तर, मुलांना घरामध्ये आणि बाहेर सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे समस्या सोडवणे. आता एक उदाहरण म्हणजे शाळेमध्ये पहिला दिवस असेल, तर कोणते मित्र असतील? कोणती शिक्षिका असेल? ही ३ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी समस्या आहे. हळूहळू शाळेमध्ये जाऊन, मुलांच्या बरोबर रोज खेळून त्यांना मित्र बनवून मग ती समस्या सुटते. हेच अभ्यासाच्या बाबतीत, खेळ शिकण्याच्या बाबतीत वगैरे सुद्धा दिसून येत.

४. सामाजिक कौशल्य…

काही वेळेस मुलं एकत्र असतात पण एकत्र खेळू शकत नाहीत. हे होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सामाजिक खेळ ( ग्रुप प्ले ) कसे खेळायचे हे खूप वेळेस मुलांना माहीत नसतं. शेअरिंग, सूचना देणे आणि ऐकणे, खेळाचे वर्णन करून सांगता येणे वगैरे कौशल्ये वाढण्यासाठी मुलांना इतर मुलांशी खेळायची संधी उपलब्ध करून द्या. याशिवाय रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहणे, रस्त्यावरती न पळणे, सिग्नल पाळणे, खेळताना स्वतःची काळजी घेणे इत्यादी. सामाजिक कौशल्ये पालक शिकवतील तेव्हाच मुलं शिकतील.

*५. शारीरिक कौशल्ये…*

कोणतेही कार्य करण्यासाठी मुलांची शारीरिक कौशल्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. साधारण ४ वर्षापर्यंत मुलांमध्ये डोळे आणि हात यांचा समन्वय, दोन्ही हाताचे समन्वय, मेंदू आणि शरीर यातील समन्वय असणं गरजेचं आहे. पोहायला जाणे, सायकल चालवणे, नाच करणे, एखादा खेळ शिकणे  अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत केल्याने त्यांची शारीरिक कौशल्ये विकसित व्हायला मदत होते.

६. भावनिक कौशल्य…

मुलांच्या भावना या वयानुसार आणि स्वभावानुसार बदलत असतात. त्यांना आजूबाजूच्या गोष्टीचा जसा अनुभव येत जातो त्याप्रमाणे मुलं भावना व्यक्त करतात. काही वेळेस तीव्र तर काही वेळेस सौम्य भावना व्यक्त करताना दिसतात. एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे सुद्धा मुलांना या वयामध्ये समजतं. म्हणजे एखादं कार्टून कॅरॅक्टर हे प्रत्यक्षात नसतं त्यामुळे आपल्याला कितिही त्याप्रमाणे वागावंस वाटलं तरी सत्यात मला तसं वागत येणार नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page