रत्नागिरी, दि. 11: (जिमाका) – जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी. कासव महोत्सव घ्यावेत. खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची योजना, मधमाशी पालन याबाबत विविध विभागांनी एकत्र येवून नियोजन करावे, असे निर्देश सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात सिंधुरत्न समृध्द योजनेची बैठक आज झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाच्या उभारणीबाबत आवश्यक ती केंद्र शासनाची परवानगी घ्यावी. जिल्ह्यात येणाऱ्या हाऊस बोटींसाठी पायाभूत सुविधांचे काम उदा. डेकवर खुर्च्या, फ्लोटिंग जेट्टी याची कार्यवाही सुरु करावी. चार खोल्या, एक रेस्टॉरंट याबाबतची योजना तयार करावी. तीस आसनी, चाळीस आसनी होड्या विकत घेवून त्या बचतगटांना चालवायला द्याव्यात. स्पाईस व्हिलेज तयार करण्यासाठी गोवा येथे भेट देवून पाहणी करावी. त्याचबरोबर कृषी विभागाने आंतरपिक योजना तयार करावी. यामधून पर्यटन वाढ होण्यास मदत होईल. स्पाईस व्हिलेजमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून त्याबाबतची सबसिडी देणारी योजना तयार करावी. एक रेस्टॉरंट, किचन, होम स्टे कॉटेज याबाबतची योजना करावी.
कासव संवर्धन असणाऱ्या गावांमध्ये होम स्टे ची योजना करावी. कासव महोत्सव सुरु करावेत असे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, खेकडा पालन, कोंबडी पालन, दुधाळ जनावरे, देशी गाई पालन, मधमाशी पालन याबाबत लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी सविस्तर माहिती देवून विभागप्रमुखांना कार्यवाहीविषयी सूचना दिल्या. त्याचबरोबर झालेल्या कामांचा विविध विभांगाकडून आढावाही त्यांनी घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीकांत हावळे यांनी संगणकीय सादरीकरण करुन, महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊसबोट बाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सिंधुरत्न समृध्द योजनेतून चार टुरिस्ट वाहने घेतली आहेत. त्यापैकी शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी एका वाहनाची पाहणी केली.