मुंबई- मुंबई तसेच उपनगरांत कालपासूनच संततधार आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता मुंबईतील लोकलसेवेवर देखील याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सेवा सध्या उशिराने सुरु आहेत.
चाकरमन्यांची गैरसोय..
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी आज पहाटेपासून तुफान पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होत आहे.
पाणी पुरवढा करणारे तलाव भरले
संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्त्वाचा असणारा विहार तलाव आज मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे. तर पूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव पूर्ण भरुन वाहू लागला.