चेंगराचेंगरीत ४०० भाविक जखमी; एकाचा मृत्यू …
पुरी l 08 जुलै- समुद्रकिनारी असलेले तीर्थक्षेत्र पुरी हे भगवान जगन्नाथ यांचा वार्षिक रथयात्रा उत्सव 53 वर्षांनंतर दोन दिवस चालणार्या सुरळीत आयोजनासाठी सज्ज झाले आहे. लाखो भाविकांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.
अधिकार्यांनी सांगितले की, सहसा एक दिवस होणारा रथयात्रा उत्सव सुरळीतपणे पार पडण्यासाठी ओडिशा सरकारने व्यापक व्यवस्था केली आहे. काही खगोलीय कारणांमुळे ही रथयात्रा दोन दिवस राहणार आहे. यापूर्वी दोन दिवस रथयात्रा १९७१ मध्ये काढण्यात आली होती. पुरीमध्ये तब्बल ५३ वर्षांनंतर ही दोन दिवसांची रथयात्रा होत आहे. १९७१ पासून ही रथयात्रा एक दिवसाची होत होती. यंदा ती दोन दिवसांची करण्यात आली. दरवर्षी होणा-या रथयात्रेत नेहमीच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
यावर्षी काही परंपरांना फाटा देण्यात आला आहे. यात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र या तीन भावंड देवतांचा समावेश असलेल्या उत्सवाशी संबंधित काही विधी देखील रविवारी एकाच दिवशी झाले. जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारासमोर रथ उभे करण्यात आले असून, तेथून ते गुंडीचा मंदिरात नेण्यात येणार आहेत. तेथे आठवडाभर रथांचा मुक्काम राहणार आहे. रविवारी दुपारी भाविकांनी रथ ओढला.
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या या रथयात्रेदरम्यान रविवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ४०० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले असून, यातील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. जखमी भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, ऐनवेळी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला, यावेळी चेंगराचेंगरीमुळे या रथयात्रेला गालबोट लागले.