उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; अपहरण झालेल्या १३ वर्षीय मुलाची पोलीसांनी केली सुखरुप सुटका; आरोपींना केले जेरबंद…

Spread the love

जालना- जालना शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. तर पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. शहरातील १३ वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केले आणि त्यानंतर २ तासांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली.

नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या श्रीहरी कृष्णा मुजमुलेचं सकाळी शाळेत जाताना अपहरण झालं. श्रीहरी जिवंत हवा असेल तर ५ कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली. त्यानंतर शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवरून हा प्रकार सांगितला. फडणवीसांनीही तात्काळ दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या.

फडणवीसांच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी तपासाला सुरुवात केली. मुलाचे वडील कृष्णा यांना अपहरणकर्त्यांचा फोन येत होता. हा ट्रेस करण्यात आला. ५ कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य नाही, २० लाख देतो असं मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासाची चक्रे फिरवली. रात्रीच्या आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलावले. त्याठिकाणी आधीच पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. या थरारक ऑपरेशनची भनक जर अपहरणकर्त्यांना लागली असती तर मुलाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

रात्री ८ च्या सुमारास २० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी मुलाचे वडील पोहचले. पोलीस या भेटीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. यावेळी २ पथके तयार करण्यात आली. त्यातील एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी होतं. दोन्ही पथकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी आरोपींची गाडी आली त्यातून २ आरोपी खाली उतरले त्यांनी मुलाच्या वडिलांकडील पैशांची बॅग घेतली तर तिसरा आरोपी गाडीत श्रीहरीला घेऊन बसला होता. पोलिसांच्या एका पथकाने पैसै घेणाऱ्या २ आरोपींना पकडले तर दुसऱ्या पथकाने गाडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या अशाप्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरुप सुटका करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page