चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे २०० मीटरचा भाग खचला आहे. या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. या घटनेनंतर तात्काळ एकेरी मार्ग बंद केला असून येथे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे. या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाट त्रासदायक ठरला आहे. येथील दरड कोसळण्याचा प्रकार तर अक्षरशः डोकेदुखी बनली आहे. .
त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी घाटातील अडचणी मात्र कमी होताना दिसत नाहीत. पावसाळ्यात येथे कोणताही धोका उदभवू नये, पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला देखील संरक्षण मिळावे व येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी येथे सुमारे २०० मीटरची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. परंतु गेले दोन दिवस सुरु असलेल्या प्रचंड पावसामुळे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून मातीचा भरावही खाली आला, तसेच येथील सर्विस रोडला देखील तडे गेले.महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाला कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु दक्षता म्हणून येथे एक बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पोलीस व प्रशासकीय अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे कर्मचारी येथे तळ ठोकून आहे.