रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी अहे. ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केला. परिवहन विभागामार्फत जिल्ह्यातील विविध शाळांना रस्ता सुरक्षा विषयक करण्यात आलेले प्रबोधन, अल्पवयीन वाहन चालकांची तपासणी करुन केलेली कारवाई, मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांची केलेली तपासणी तसेच जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयांमध्ये केलेले रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन तसेच जिल्हयातील काही शाळांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक चिन्हांची माहिती असणाऱ्या स्कूल बॅगचे विद्यार्थ्यांना केलेल्या वाटपाची माहिती त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी यावेळी मागील सभेच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शिक्षण विभाग, परिवहन विभाग, पोलीस विभाग व जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालकांना खालील प्रमाणे सूचना केल्या.
सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करुन सदरची माहिती अद्ययावत करावी व त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात. राज्य परिवहन महामंडळाने शाळांच्या मागणीनुसार शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी एस. टी. बसेसची व्यवस्था करावी. सर्व शाळांनी आपल्या शाळेच्या सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत प्रयत्न करावेत. शालेय वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत जारी करण्यात आलेले हेल्पलाईन नं. ०२३५२-२२९४४४ व मो. नं. ८२७५१०१७७९ या क्रमांकावरती तक्रार करावी. तसेच पोलीस विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या ११२ या टोल फ्री क्रमांकावरती न घाबरता गुन्ह्याची माहिती दिल्यास पोलीस तात्काळ आपल्या मदतीला उपलब्ध होतील. तरी नागरिकांनी न घाबरता सदर क्रमांकावरती तक्रार करण्याच्या सूचना केल्या.
खासगी प्रवासी वाहनातून विद्यार्थी वाहतूक तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी तपासणी करुन कारवाई करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी असून, ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडण्याच्या सूचना सर्व विभागांना श्री. कुलकर्णी यांनी केल्या.
बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदींसह पालक, शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.