रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. शेतात पेरणीसह उखळणीला सुरुवात झाली आहे. बैलांच्या नांगराऐवजी सध्या मशिनने शेतीच्या कामाला गती दिली जात असल्याचे चित्र शेतशिवारात दिसू लागले आहे.
शुक्रवारपासून जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात झाली. शनिवारी दिवसभर आभाळ भरुन आले होते. दुपारनंतर मान्सूनच्या सरी जोरदार बरसायल्या सुरुवात झाली. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. यामुळे शेतातील माती ओलीचिंब झाल्यामुळे रविवारी सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांनी आपले अवजारे बाहेर काढत शेतीची ठिकाणे गाठून, पेरणीला सुरुवात केली. रत्नागिरी जवळच्या मिरजोळे पाडावेवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच येथील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शेताच्या उखळणीलाही सुरुवात झाली आहे. बैलजोड्यांना नांगर बांधण्याऐवजी अनेक शेतकरी पॉवर ट्रिलरचा वापर नांगरण्यासाठी करीत आहेत. कोकणात छोटेछोटे मळे किंवा दळे असल्याने ट्रॅक्टर ऐवजी पॉवर ट्रिलर वापरणे अधिक सोपे आहे. डोंगराळ भागातील शेतातही पॉवर ट्रिलरचा वापर वाढला आहे. शासनाकडून पॉवर ट्रिलर खरेदीसाठी अनुदान मिळत असल्याने याच्या वापरात वाढ झाली आहे.