रत्नागिरी/९ जून: राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरी शहरामध्ये भाजपातर्फे जल्लोष करण्यात आला. मारुती मंदिर येथे मंडप उभारून मोठ्या स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते.
यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. लाडू वाटप करण्यात आले. नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी केली. ढोल ताशांचा गजर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली व त्यांच्यासोबत विविध मंत्र्यांनी शपथ घेतली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी अतिशय सुरेख झाली. मारुती मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते भाजपाचे झेंडे घेऊन नाचत होते. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले. त्याबद्दलही आज जल्लोष करण्यात आला.
यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार बाळ माने यांच्या समवेत शहराध्यक्ष राजन फाळके तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, भाजपचे सर्व नगरसेवक, तसेच माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. बाबा परुळेकर, ॲड. विलास पाटणे, ॲड. भाऊ शेट्ये, सचिन वहाळकर, सचिन करमरकर, नंदू चव्हाण, दादा ढेकणे, प्राजक्ता रूमडे, सोनाली आंबेरकर, वर्षा ढेकणे, मंदार खंडकर, लीलाधर भडकमकर, आदींसह भाजपचे सर्व मोर्चा व आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.