योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या उद्देशाची पूर्तता झाली आहे का? यासाठी पाणीटंचाईच्या कालावधीतच पाण्याचा मुबलक स्त्रोत दर दिवशी नियमित होणारा पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने पाणीटंचाईच्या कालावधीतच सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे केले आहे.
जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली करोड रुपये खर्च होत असताना अनेक भागांमध्ये आजही तक्रारी आहेत. पाण्याचे बारमाही स्त्रोत सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.अनेक ठिकाणी तांत्रिक चुका अधिकारी आणि ठेकेदारांनी केल्या असून दर दिवशी प्रतिमाणसी 55 लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायमची निकालात निघण्याच्या दृष्टीकोणातून या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे की,करोड रुपये खर्च करूनही रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी संपणार नसेल,अनेक ठिकाणी नव्या योजना पूर्णत्वास गेल्या नसतील तर जलजीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीबाबत खालील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी पाणी टंचाई असताना पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणे गरजेचे आहे.
१)पाण्याचा मुबलक स्त्रोत,२) दर दिवशी होणारा पाणीपुरवठा आणि ३)पाणी योजनेच्या कामाचा दर्जा या तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्या मार्फत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनांच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत सुहास खंडागळे यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना ही ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी अशी योजना आहे.या योजनेत पाण्याचा बारमाही स्त्रोत,पाण्याच्या सोर्सचे सक्षमीकरण, दर दिवशी प्रति माणसी ५५ लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला घरापर्यंत देणे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.मात्र या बाबींची पूर्तता योजनेच्या अंमलबजावणीत झाली आहे का? हे पावसाळ्याआधी पाण्याची टंचाई असताना तपासणे गरजेचे आहे. याच कालावधीत कोणत्या योजना यशस्वी झाल्या आहेत याची वस्तुस्थिती समजेल. नवी योजना असतानाही ज्या गावांमध्ये पाणीटंचाई असेल तेथील जलजीवन मिशन योजनांची बिल थांबवण्यात यावीत. याबाबत आपण योग्य ती दखल घेऊन जिल्ह्यातील पाणी समस्या कायमची निकालात काढण्याच्या दृष्टीने जलजीवन मिशन योजनांच्या कामाची वरील तीन मुद्द्यांच्या आधारे चौकशी करावी असे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे.