नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान अद्याप शिल्लक आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्या पूर्वीच भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने आपल्या शपथविधीची तयारी सुरू केली आहे.
▪️यावेळेचा शपथविधी सोहळा अगदी भव्य असा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार नव्या सरकारचा शपथविधी यावेळी कर्तव्य पथ येथे म्हणजे पूर्वीचा राजपथावर होणार आहे. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
▪️राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणाऐवजी कर्तव्यपथावर सोहळा ठेवण्यामागचे कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यावेळी उपस्थित राहता यावे हे आहे. निवडणुकांचे निकाल हाती येताच या तयारीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार २४ मे रोजी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाची बैठक झाली होती. बैठकीला ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. त्यात शपथविधी सोहळ्याच्या कव्हरेज संदर्भात पूर्ण योजना तयार करण्यात आली.
▪️कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी साधारण १०० कॅमेरे वापरले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कालच ९ जून रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. १० जून हा त्यांच्या पक्षाचा स्थापना दिवस आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनीच सांगितले की यावेळी ते शपथविधी सोहळ्यात व्यस्त राहतील त्यामुळे यावेळी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करणे शक्य होणार नाही.
🔹️कर्तव्य पथ का?
▪️२०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली तेंव्हा राष्ट्रपती भवनात त्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र ठिकाण बदलण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पानंतर आता हा परिसर नव्याने झळाळून उठला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून नव्या भारताची झलक संपूर्ण जगाला दाखवण्याचा यामागे विचार आहे. राष्ट्रपती भवनात सोहळा आयोजित केल्यावर प्रोटोकॉलमुळे लोकांच्या उपस्थितीला मर्यादा येतात. मात्र सोहळा जर कर्तव्य पथावर झालो तर कैकपटीने अधिक लोकांना सहभागी होता येईल.