केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले..
बारा ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे आज पुजेनंतर उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 7.15 वाजता बाबा केदारचे दरवाजे भक्तांना वैदिक मंत्रोच्चारासह दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी संपूर्ण केदारपुरी ‘बम-बम भोले’, ‘जय बाबा केदार’च्या जयघोषानं दुमदुमली होती. त्यामुळं परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं.
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : जगप्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे नियम आणि परंपरेनुसार भाविकांसाठी आज (10 मे) सकाळी 7.15 वाजता उघडण्यात आले आहेत. यावेळी मंदिराला 24 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद, केदारनाथ रावल भीमाशंकर लिंग, मुख्य पुजारी शिव शंकर लिंगा, प्रशासन, बीकेटीसी अधिकारी आणि शेकडो यात्रेकरूंच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुलं…
सर्वप्रथम प्रशासनाच्या उपस्थितीत मुख्य दरवाजाचे कुलूप उघडण्यात आलं. यानंतर गर्भगृहाचा दरवाजा उघडण्यात आला. रावल आणि मुख्य पुजारी यांच्या पूजेबरोबरच गर्भगृहात दर्शनाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी पहाटेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. यानंतर, शनिवारी (11 मे) केदारनाथमध्ये रक्षक देवता म्हणून भगवान भैरवनाथांचे दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथ मंदिरात बाबा केदारची आरती आणि भोग प्रसाद व्यवस्था सुरू होईल.
9 मे ला बाबा केदारची डोली केदारनाथला पोहोचली…
गुरुवारी (9 मे) जगप्रसिद्ध 11 वे ज्योतिर्लिंग, भगवान केदारनाथची जंगम मूर्ती, पंचमुखी डोली केदारनाथ धामला पोहोचली. यावेळी भाविकांनी ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘जय बाबा केदार’च्या गजरात डोलीचं स्वागत केलं. यावेळी सैन्याच्या 6 ग्रेनेडियर रेजिमेंटच्या बँडच्या भक्तिमय सुरात डोलीचं स्वागत करण्यात आलं.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज केदारनाथ धामवर पोहोचले…
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज हे चार दिवसीय बद्री केदारच्या धार्मिक यात्रेच्या पहिल्या दिवशी केदारनाथ धाममध्ये पोहोचले. यावेळी केदार सभेचे पुजारी आणि ज्योतिर्मठचे प्रभारी मुकुंदानंद ब्रह्मचारी यांनी त्यांचं स्वागत केलं. भगवान केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा बद्रीनाथ धामला रवाना होतील.
मुख्यमंत्री धामी यांनी केलं बाबांचं दर्शन…
मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी केदारनाथ धाम येथे पोहोचले. त्यांनी सर्वप्रथन बाबा केदारांचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली. त्यानंतर ते डेहराडूनला रवाना झाले.
यात्रा मार्गाची 2 सुपर झोन, 3 झोन आणि 11 सेक्टरमध्ये विभागणी…
चारधाम यात्रेसंदर्भात पोलीस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांनी पाहणी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. एसपी भदाणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व विभागांशी परस्पर समन्वय साधून यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यास सांगितले. यावेळी सुरळीत चालू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयापासून सोनप्रयागपर्यंत, त्याची 2 सुपर झोन, 3 झोन आणि 11 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे.