रत्नागिरी : “तुमच्या वतीने मी बावनकुळे साहेबांना वचन देतोय की या लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळणार आहे, पण आमच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किमान ४० हजारांचे मताधिक्य देणार,” असे आश्वासन माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी दिले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा रत्नागिरीतील जवाहर मैदानावर ३ मे रोजी आयोजित केली आहे. या सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा मंत्र दिला, त्यांची रत्नागिरी जन्मभूमी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कर्मभूमी आहे. या जिल्ह्यामध्ये आमच्या तीन भारतरत्न होऊन गेले आणि म्हणून अशा नररत्नांची खाण आहे यापूर्वी बॅ. नाथ पै खासदार म्हणून निवडून आले होते, प्रा. मधू दंडवते खासदार म्हणून निवडून आले ते केंद्रीय मंत्री म्हणून होते.
आमच्या या रत्नागिरीचे भारतीय जनता पक्षाचे नेते कै. ॲड. बापूसाहेब परुळेकर रत्नागिरीचे खासदार होते. आम्हाला आमचा राजकीय वारसा आहे आणि त्यामुळे गेल्या मधल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या एका विचारांना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत होतो आणि त्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या मतावरती निवडून आलेला होता हे काही लोकांच्या ठिकाणी विसरले आणि म्हणून त्या ठिकाणी मी आठवण करून देऊ इच्छितो की २०१४ आणि २०१९ नवीन खासदार निवडून आले होते. आता मात्र त्यांचा पराभव यापूर्वीच झाला आहे, कारण त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी नाही आहे आणि भविष्यामध्ये नारायण राणे यांच्या सोबतीला आपण सगळेजण आहात राष्ट्रवादी अजित दादाचा काय शिवसेना शिंदे आरपीआय या ठिकाणी एकत्र आहेत. त्यामुळे उद्याचा विजय निश्चित आहे, याची मला शंभर टक्के खात्री आहे.”
या वेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.