संंगमेश्वर- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संंगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर स्थानिकांची धुळीच्या त्रासातून लवकरच मुक्तता होणार आहे. मे अखेर या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना आरवली बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गात उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील काही महिन्यापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मातीचा भराव टाकून उड्डाणपूल उभारला जात आहे. आरवलीतील नागरिकांना तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना दोन्ही बाजूने ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. भुयारी मार्ग करताना मातीचा मोठयाप्रमाणावर वापर झाला आहे. उड्डाणपुलाच्या भरावासाठी लागणारी माती इतर ठिकाणाहून डंपरने येथे आणण्यात आली आहे.
त्यामुळे रात्री आणि दिवसा मातीची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मातीचा आणि धुळीचा येथील विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक भाजी विक्रेत्यांनी सकाळी आणलेल्या भाजीवर धुळीचा राब बसल्यानंतर ती भाजी चार दिवसापूर्वी शेतातून काढल्यासारखी वाटत होती. विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर धुळीचा राब बसत होता. या संदर्भात विक्रेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी राजकीय पाठबळ कमी पडले. शेवटी येथील विक्रेत्यांनी धुळीपासून वाचण्यासाठी दुकानाच्या दर्शनी बाजूवर विशिष्ट प्रकारचे कापड लावले.
घरामध्ये धूळ येऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या. घराच्या समोरील अंगणात सकाळ-संध्याकाळी पाणी मारले होते. आरवली येथे रविवारी आठवडा बाजार भरतो. रस्त्यालगत भरणाऱ्या या बाजारात विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या मोठी असते. धुळीच्या त्रासामुळे आठवडा बाजारावरही परिणाम झाला होता. रस्त्यालगत एखादे वाहन उभे केले किंवा माणूस उभा राहिला तर त्यालाही धुळीचा त्रास होतो. तब्बल दोन वर्षे येथील नागरिक धुळीचा त्रास सहन करत होते अखेर उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे येथील नागरिकांचा धुळीचा त्रास कमी होणार आहे. आरवली येथे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मातीचा भराव टाकून पूल तयार झाला आहे. दोन्ही बाजूचे जोड रस्तेही तयार आहेत. रस्त्याचे मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण केल्यानंतर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होईल. मे अखेर उड्डाणपूल सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूणचे उप-अभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.