▪️रत्नागिरी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाई या महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचाराकरिता भारताचे गृहमंत्री, भाजपा नेते अमित शहा उद्या ३ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा घेणार आहेत. याकरिता प्रचंड मोठा मंडप गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर उभारण्यात आला आहे. सभेची वेळ दुपारची असली तरी पूर्ण मैदानावर मंडप व्यवस्था असून पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा मतदारांचे आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्याकरिता शहा रत्नागिरीत येत असून अशा या कणखर नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली..
▪️३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार असून या सभेला प्रचंड गर्दी होणार असून भाजपा महायुतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सभेची जय्यत तयारी झाली आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो वाहनांतून महायुतीचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होणार आहेत.
▪️अमित शहा रत्नागिरीत प्रथमच विराट सभेकरिता येणार असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या जंगी स्वागतची तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सभेकरिता नियोजन केले आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सभेला येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था १० ते १२ ठिकाणी करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत.
▪️या सभेला व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, माजी खासदार निलेश राणे, किरण सामंत, लोकसभा सह प्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, अॅड. बाबा परुळेकर, राष्ट्रवादीचे अजित यशवंराव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, दत्ता सामंत यांच्यासमवेत महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
▪️आज सायंकाळी मंडपाची व्यवस्था पाहण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सचिन वहाळकर, उमेश कुळकर्णी, सचिन करमरकर, मंदार खंडकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. सभेसाठी ३२ फुट बाय ५४ फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तब्बल २० हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या स्क्रिनवर सभा पाहता येणार आहे. तसेच सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज दुपारपासून पोलिस पाहणी करत असून सर्व परिसराची कसून तपासणी करण्यात येत होती.