मुंबई- देशात उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत असताना एक आनंदाची बातमी समोर आहे. मान्सूनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती आहे. येत्या २१ दिवसात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे.
मान्सूनचं आगमन यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पावसासंदर्भात दिलासा देणारं वातावरण लवकरच तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच पाऊस लवकर येणार असल्याच्या शक्यतेनं काहीसा दिलासा लोकांना दिला आहे.
पॅसिफिक महासागरातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात एलनीनोचा प्रभाव राहिला. त्यामुळे मान्सूनने ओढ दिली. काहीभागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र एलनीनीचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी १०० टक्के नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशाच्या सर्वच भागात यंदा सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे. देशभर वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. यावर्षी तापमानाचा पार कमालीचा वाढला आहे. अनेक भागातील तापमान ४२ अंशांच्या पुढे गेलं आहे. अशा परिस्थिती यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.