पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (27 एप्रिल) कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. जगात भारी कोल्हापुरी, असं म्हणत पंतप्रधानांनी मराठीमधून आपल्या भाषणाची सुरूवात केली. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची विराट सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तसंच “महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा सांगणारं कोल्हापूर शहर आहे. मात्र, काँग्रेसच्या काळात सामाजिक न्यायाची राज्यात हत्या झाली. यामुळंच अनेकांचे अधिकार हिरावले गेले, अशा लोकांना तुम्ही मतं देणार का?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.मराठीत केली भाषणाची सुरुवात : पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करतो, तमाम कोल्हापूरकरांना माझं त्रिवार वंदन, असं मोदी म्हणाले. पुढं काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “काँग्रेसचा अजेंडा आहे की सत्तेवर आल्यानंतर 370 कलम पुन्हा आणणार, पण कुणात मोदी सरकारनं घेतलेले निर्णय मागे घेण्याची, नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्याची हिंमत आहे का?” असा सवाल करत काँग्रेस आणि इंडिया आघाडी एका वर्षात एक, असे पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला.
…हे पाहून बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं असेल?…
पुढं ते म्हणाले की, “राम जन्मभूमी अयोध्येत 500 वर्षांचं स्वप्न राम मंदिराच्या निमित्तानं पूर्ण झालंय. मात्र, राम मंदिराचं निमंत्रण काँग्रेसला दिल्यानंतर त्यांनी ते धुडकावलं. जो रामाचं निमंत्रण स्वीकारत नाही त्यांचं काय होणार? तसंच सनातन हा डेंग्यू आहे असं म्हणलं जातंय. जे लोक सनातनच्या विनाशाची गोष्टी करताय, त्यांचा सन्मान इंडिया आघाडीचे लोक करत आहेत. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं असेल? किती दुःख झालं असेल, असंही मोदी म्हणाले.
सभा ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त
दहा वर्षानंतर ऐतिहासिक तपवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असल्यानं या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. केंद्रीय पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीनं गेली दोन दिवस मैदानावर खडा पहारा ठेवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.