गडचिरोली- राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.
गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात १० उमेदवार आहेत. सहा विधनासभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. १८९१ मतदान केंद्रांवर १६ लाख १८ हजार ६९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष मतदार ८ लाख १४ हजार ७६३ असून महिला मतदारांची संख्या ८ लाख २ हजार ४३४ आहे. तृतीयपंथी १० मतदार आहेत. संवेदनशील ३१९ मतदान केंद्रे असून माओवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे १५ हजार जवानांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. गडचिरोलीसह आरमोरी, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात सकाळी सात ते दुपारी तीन अशी मतदानाची मुदत आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर येथे सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.