अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ४७ टक्के मार्गिका पूर्ण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे सदस्य रूप नारायण सनकर यांनी शनिवारी (ता. २) पनवेल-कर्जत मार्गाच्या कामाची पाहणी केली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता व इतर अधिकारी त्या वेळी उपस्थित होते. डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवले आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेमुळे पनवेलमार्गे सीएसएमटी-कर्जत असा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. ते लक्षात घेऊन २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यास मंजुरी देण्यात आली. एमआरव्हीसीने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. रूप नारायण सनकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
२९.६ किमीच्या पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले व कर्जत अशी पाच स्थानके आहे. त्याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे होणार आहेत. ३.१२ किमीचे तीन बोगदे असणार आहेत.
मार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे आणि ३६ लहान पूल असणार आहेत. सर्वांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुहेरी मार्गिकेसाठी २ हजार ८१२ कोटी रुपये खर्च लागणार आहे.
भूसंपादनाचा अडथडा दूर..
प्रकल्पासाठी १३५.८९३ हेक्टर जमीन लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व जमिनीचा ताबा रेल्वेला मिळाला आहे. प्रकल्पासाठी ५७.१६ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. ३० मे २०२२ रोजी ९.१३१ हेक्टर वनजमिनीला मंजुरी मिळाली. वनजमिनीत काम करण्याची परवानगी मिळाली असून कामही सुरू झाले आहे.
प्रस्तावित रेल्वेमार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. त्यांपैकी वावर्ले बोगदा २६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यंत २६२५ पैकी १६९१ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले आहे. पुढील काम प्रगतिपथावर आहे.
नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यंत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले आहे. २१९ पैकी ६८ मीटर आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
किरवली बोगदा ३०० मीटर लांबीचा आहे. १२२ मीटर जमिनीखालील उत्खनन पूर्ण झाले असून पुढील काम प्रगतिपथावर आहे.