‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले असा हल्लाबोल ठाकरे गटाने मुखपत्रातून केला आहे. तसेच हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. शिवाय अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीसांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत असेही म्हणत आज ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदी यांचा कारभार संविधानविरोधी
”मोदी यांचा कारभार संविधानविरोधी आहे व पुन्हा ते महाराष्ट्रात येऊन नैतिकता व साधनशूचितेच्या गप्पा मारतात. हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे व मोदी यांनी हा धंदा जोरात चालवला आहे. जात प्रमाणपत्राचा घोटाळा करणाऱ्या नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळतो व अशाच प्रकरणात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली जाते. एक अपराध व दोन न्याय हे मोदी राज्यातच घडू शकते. त्यामुळे ‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले. हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
मोदींच्या वक्तव्यांचा शिमगाच सुरू
”विरोधक जनतेला मूर्ख बनवताहेत, असे गमतीचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येऊन केले. शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदी यांची कधीच ख्याती नव्हती. त्यात आता निवडणुकांचा मोसम असल्याने मोदींच्या वक्तव्यांचा शिमगाच सुरू झाला आहे. मोदी सरकारने दहा वर्षे देशाला व जनतेला मूर्खच बनवले याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, पण विरोधक जनतेला मूर्ख बनवत असल्याचा फटाका मोदी यांनी फोडला”, असे म्हणत ठाकरे गटाने मोदींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात
”देशभरातील सर्व भ्रष्टाचारी, व्यभिचारी मोदी यांनी भाजपात घेतले. त्यातल्या अनेक बडय़ा भ्रष्टाचाऱ्यांवर स्वतः मोदी यांनी प्रहार केले होते. भाजपात या सगळ्यांना प्रवेश देऊन मोदी यांनी त्या सगळ्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले आहे. अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीसांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात आहे व मोदी त्या सगळ्यांना अभय देत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना कोण वाचवत आहे हेदेखील उघड आहे”, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
मणिपुरात जाण्याचे धैर्य मोदी दाखवू शकले नाहीत
”हजारो कश्मिरी पंडित आजही निर्वासितांच्या छावण्यांत राहतात व 370 कलम हटवून भारतीय संविधान लागू केल्याचा फायदा पंडितांना होऊ शकलेला नाही. मग कोणत्या भारतीय संविधानाची भाषा मोदी प्रचार सभांतून करीत आहेत? मणिपुरातून भारतीय संविधान पूर्णपणे उखडले गेले आहे व संविधानाच्या रक्षणासाठी मणिपुरात जाण्याचे धैर्य मोदी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे संविधान मोदींच्या नावाने अश्रूच ढाळत असेल. डॉ. आंबेडकर यांना कोणत्याही पदव्यांची व किताबांची गरज नाही त्यांचे मोठेपण जगाने मान्य केले आहेच. ‘भारतरत्न’ची मोदी काळात इतकी अप्रतिष्ठा केली आहे की, आज डॉ. आंबेडकर असते तर त्यांनी ‘भारतरत्न’चे भेंडोळे मोदींच्या तोंडावरच फेकले असते” असे भाष्य ठाकरे गटाने केले आहे.