मुंबई- आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ व्या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला आहे. त्याने १७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.
मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना इशान किशन आणि रोहित शर्माच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून संघासाठी १०१ धावांची सलामी दिली. रोहितने २४ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची खेळी केली.तर इशान किशनने वादळी खेळी करत ३४ चेंडूंचा ७ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ६९ धावांची खेळी केली.
शेवटी सूर्यकुमार यादवने अवघ्या १९ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची तुफानी खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने ५३ आणि रजत पाटीदारने ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर ८ गडी बाद १९६ धावा केल्या.