३ एप्रिल/रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुती म्हणून आपण मोठ्या मताधिक्याने नक्की जिंकू. भाजपा कमळाच्या निशाणीवरच ही जागा लढवणार असून, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, रिपाइं व सर्व मित्रपक्षांच्या मदतीने ही जागा मिळवू, असा दावा करतानाच विद्यमान खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. स्वा. सावरकर नाट्यगृहात रत्नगिरी, लांजा-राजापूर, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेतील बूथ, मंडल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
निवडणूक जिंकण्यासाठी आता फक्त ३३ दिवस शिल्लक राहिले असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राणे यांनी दिले. लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत दररोज किमान तीन ते पाच तास पक्षासाठी वेळ द्या. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्याविषयी मार्गदर्शन केले. मेळाव्याला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा संयोजक प्रमोद जठार, लोकसभा सहप्रभारी बाळ माने, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, व्यासपीठावर उल्का विश्वासराव, शिल्पा मराठे, सुजाता साळवी, सुरेखा खेराडे, सचिन वहाळकर, सतीश शेवडे, डॉ. चंद्रशेखर निमकर, दत्ता देसाई, प्रमोद अधटराव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी केले.
निवडणुकीसाठी आता फक्त ३५ दिवस राहिले असून, प्रचाराचे दिवस ३३ आहेत. ही जागा कमळ की धनुष्यबाण, असे करण्यापेक्षा आपण निवडणूक कार्यालय सुरू करूया, असे नीलेश राणे यांनी सांगितले. त्यासाठी जागा निश्चित झाली असून, ६ एप्रिलला भाजपच्या वर्धापनदिनी कार्यालयाचे उद्घाटन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.