लखनऊ- तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याची प्राणज्योत मालवली. समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे.
मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्याच्या गाझीपूर इथल्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या बातमीमुळं कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या रुग्णालयात सध्या त्याचं पार्थीव ठेवण्यात आलं आहे, त्या बांदा मेडिकल कॉलेजबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मुख्तार अन्सारीला गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं होतं कारागृहातील तीन डॉक्टरांचे एक पॅनेल मुख्तार अन्सारीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते, मात्र मुख्तारच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे.