अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा…

Spread the love

अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना एनडीएकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यावरून माजी खासदार आनंदराव अडसूळ नाराज असल्याचं बोललं जात आहे. याविषयी अभिजीत अडसूळ यांची प्रतिक्रिया ईटीव्ही भारतनं घेतलीय.

अमरावती – खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून एनडीएकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावरुन माजी खासदार आनंदराव अडसूळ, रवी राणा यांच्यात वर्चस्ववादातून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मात्र “आनंदराव अडसूळ यांना विचारुनच अमरावती लोकसभा मतदार संघाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा शब्द अमित शाह यांनी दिला आहे. आम्ही आजही किल्ला लढवत आहोत. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्हाला तिकीट न मिळाल्यास सगळे पर्याय खुले आहेत,” असा गर्भित इशारा आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिला आहे.

अमरावती मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला…

“अमरावती लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आजही आम्ही लढवतो. शिवसेनेचा उमेदवार असल्यास मतदारांना विचार करावा लागतो. या अगोदरही आनंदराव अडसूळ यांना इथल्या जनतेनं मोठ्या मताधिक्यानंनं विजयी केलेलं आहे. त्यामुळं कोणतीही तडजोड होणार नाही,” असा निर्धारही अभिजित अडसूळ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळं अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांवरुन अद्यापही तिढा सुटला नसल्याचं स्पष्ट झालं. अमरावती मतदार संघ भाजपा, शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

बावनकुळे संपर्कात, आम्हाला ‘वरुन’ निरोप आलाय…

“अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. त्याबाबतच्या भावना आम्ही वरिष्ठांना कळवल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपर्कात आहेत. त्यांनी वरिष्ठांना आमच्या उमेदवारीच्या दाव्याबाबत कळवलं आहे. आम्हाला वरिष्ठांनीही निरोप दिला आहे. त्यामुळं आम्ही प्रचंड आशावादी आहोत,” असं अभिजित अडसूळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आनंदराव अडसुळांना विचारुनचं निर्णय घेतला जाणार…

अमरावती लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्रावरुन भाजपासमोर मोठा पेच आहे. त्यामुळं भाजपा नेते नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. दुसरीकडं अभिजित अडसूळ “यांनी शिवसेना आमचा विचार करेल,” असं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, “अमित शाह यांनी आम्हाला शब्द दिला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात आनंदराव अडसूळ यांना विचारुनच निर्णय घेण्यात येईल, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही आपल्या संपर्कात आहेत. भाजपाचे इतर नेतेही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आमचा विचार न केल्यास आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत.”

आम्ही दहा वर्षापासून मतदार संघात….

अमरावतीत आमदार रवी राणा यांच्याकडून नवनीत राणा यांचा उमेदवार म्हणून प्रचार करण्यात येत आहे. यावेळी एनडीएकडून नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळणार आहे, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. आनंदराव अडसूळ हे स्थानिक नसल्यानं त्यांना उमेदवारी दिल्यास फटका बसेल, अशी चर्चा आहे. यावर बोलताना अभिजीत अडसूळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही मागील 10 वर्षापासून अमरावती लोकसभा मतदार संघात तळ ठोकून आहोत. अमरावतीतील नागरिकांशी आमचं घट्ट नातं आहे. इथल्या जनतेशी कधीच संपर्क तुटला नाही. त्यामुळे आम्ही स्थानिक नाही, असा प्रश्नच नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page