आमदाराने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपाने आता या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.
पश्चिम बंगाल- २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या बालमूर्तीचा एक भव्य सोहळा पार पडला. या मंदिराचं बांधकाम अद्याप सुरु आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रामलल्ला तंबूत विराजमान होते. मात्र आता २२ जानेवारीला राम मंदिरात रामाच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कारसेवकांचं, रामभक्तांचं स्वप्नच जणू पूर्ण झालं. या मंदिरात उद्घाटनाच्या दिवसापासूनच मोठी गर्दी पाहण्यास मिळते आहे. अशात आता एका आमदाराने हे मंदिर अपवित्र आहे अशी टीका केली आहे. तसंच हिंदूंनी या मंदिरात जाऊ नये असंही आवाहन केलं आहे. ज्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नेमकी काय घडली घटना?..
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदु सिन्हा यांनी एका सभेत बोलताना राम मंदिर अपवित्र आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर एकाही हिंदूने तिथे जाऊ नये आणि पूजा करु नये असंही त्यांनी म्हटलं आहे. तारकेश्वरचे तृणमूलचे आमदार रामेंदु सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसची हीच नीती आहे असं म्हणत भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
सुवेंदु अधिकारी काय म्हणाले?..
“रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांनी फक्त देशातल्याच नाही तर जगभरातल्या हिंदूंच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या आहेत. तसंच मी त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यास जात आहे.” अशी पोस्ट सुवेंदु अधिकारी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
सुवेंदु अधिकारी म्हणाले, “तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचं वास्तव या वक्तव्यातून समोर आलं आहे. हिंदूंच्या भावना दुखवायच्या, हिंदू देवतांवर टीका करायची इतकी हिंमत त्यांच्यात आली आहे. त्यामुळेच राम मंदिर अपवित्र आहे अशी वक्तव्य करण्याची त्यांची हिंमत होते आहे.” आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.