कलिंगडसह काकडी, वांगी इत्यादी पालेभाजीच्या उत्पन्नातून शुभमने बनविला आर्थिक उन्नतीचा मार्ग.
देवरूख- कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर तिचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतःच्याच शेतात निरनिराळे प्रयोग करत संगमेश्वरनजीक असणाऱ्या लोवळे येथील शुभम दोरकडे या तरुणाने एकाच वेळी मेलोडी या जातीच्या कलिंगडाचे तब्बल ५०० किलो उत्पादन घेतले. सोबतच काकडी, वांगी आणि पालेभाजीचेही उत्पादन त्याने यावर्षी घेतले आहे. या उत्पादनाद्वारे शुभमने आर्थिक उन्नती साधली असून तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शुभमने दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो लोवळे येथील स्वमालकीच्या जागेत गेली पाच-सहा वर्षे सातत्याने निरनिराळे प्रयोग करत आहे. यंदा त्याने १० गुंठे क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. तीन टप्प्यात केलेल्या लागवडीचा पहिल्या टप्प्यात तब्बल त्याने ५०० किलो कलिंगड उत्पादन घेतले आहे. अजून दोन उत्पादने आहेत ती पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होतील असा विश्वास शुभमला आहे. हे सर्व पिक घेत असताना तो रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत, व्हर्मी वॉश अशा नैसर्गिक खतांचा वापर करत आहे.
शुभमने रस्त्यालगत घर असल्याने तिथेच स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहे. त्याच्या या प्रयत्नांना आई वडील आणि बहिणीने मोलाची साथ दिली आहे. आपल्याकडे कलिंगड आणि काकडी यांना मागणी खूप आहे. त्यामुळे दररोज दोन हजार रुपयांहून अधिक किंमतीचे कलिंगड आणि भाजी विक्री होते. कृषीशिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी केला आणि स्वतःच्या मालकीची जमीन लागवडीसाठी उपयुक्त असल्याने तिचा भाजीपाला लागवडीसाठी योग्य वापर करून घेतला असल्याचे तरुण शेतकरी शुभम दोरकडे याने सांगितले.