गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपा कार्यकर्ता महासंमेलनासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग-लोकसभा मतदारसंघात कमळच फुलणार असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
रत्नागिरी CM Pramod Sawant- रत्नागिरी सिंधुदुर्ग-लोकसभा मतदारसंघात कमळच फुलणार, मी देवेंद्र फडणवीस पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हक्काने सांगेन की, या ठिकाणी कमळच फुलणार आहे असं, भाजपा नेते गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. भाजपाकडून आज रत्नागिरीत भाजपा कार्यकर्ता महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सावंत बोलत होते.
येथे कमळच फुलणार…
यावेळी प्रमोद सावंत म्हणाले की, कोणीही काहीही चिंता करू नका, या मतदारसंघात इतर कोणीही कमळाची तिकीट मागूच शकत नाही. “यही समय है, सही समय है” येथे कमळच फुलणार आहे, असं पुन्हा एकदा मतदारसंघाबाबत त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मावळ, रायगड आणि रत्नागिरी हे तिन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता…
भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ही जागा भाजपाची असून या ठिकाणी भाजपाच लढणार असल्याचं ट्विट केलं होतं. तर शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील ही जागा आमचीच असून आम्ही लढणार असल्याचं म्हटलं होतं. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील यावरून भाजपावर टीका केली होती. ही जागा आमचीच असून आम्हीच लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील ही जागा भाजपाची असून भाजपाचाच उमेदवार असावा यासाठी आपण वरिष्ठांशी बोलणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं आगामी काळात या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.