सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)-रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मी इच्छुक आहे, असा दावा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. त्यामुळे जठार यांच्या समर्थनासाठी भाजपच्या निष्ठावंतानी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. माजी आमदार जठार यांच्याकडे या मतदार संघाचे प्रमुख म्हणून पक्षाने आधीच निवड केली आहे. त्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दावा केला आहे.
या मतदार संघासाठी आपण इच्छुक नसल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संगितले आहे. दुसरे चर्चेत असलेले सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा या मतदार संघासाठी इच्छुक नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी उचल घेतली असून त्यांचे नाव चर्चेत पुढे आले आहे.
२००९ साली प्रमोद जठार यांनी कणकवली विधान सभा मतदार संघाची निवडणूक लढविली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि एक निवृत्त बँक अधिकारी मतदारांसाठी नवा चेहरा दिल्याने लोकांनी पसंत केले होते. त्यावेळी एक चमत्कार घडला होता. त्यावेळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक आणि अपक्ष उमेदवार दिवंगत कुलदीप पेडणेकर या तंगड्या उमेदवारांचा पराभव करून जठार हे निवडून आले होते. भाजपने लोकांसमोर चांगला चेहरा दिल्याने जठार हे जिंकले होते. त्यानंतर जठार हे कोकणातील राजकारणात सक्रिय राहिले. राणे आणि त्यांच्या पक्षाला भाजपात प्रवेश देताना जठार यांनी महत्वाची भूमिका घेतली होती. सवार्ंना सोबत घेऊन काम करायची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला राणे समर्थकांचा पाठिंबा आहे, असं सांगण्यात येते. बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीमुळे कोकणाचा विकास आणि रोजगार हा मुद्दा घेऊन जठार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून उतरविले जाईल, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. जठार यांनी या लोकसभा मतदार संघाचा नुकताच दौरा केला असून आपण स्वतः इच्छुक असल्याचे जठार यांनी म्हटले आहे.