चिपळूण: रिफायनरीच्या विरोधात वृत्तांकन केल्याच्या रागातून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात घडवून हत्या केल्याचा संशय आहे. गृह खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी चिपळूणातील पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देत काळ्या फिती लावून निदर्शने केली.
प्रांताधिकारी प्रविण पवार तसेच तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन देताना चिपळूणातील पत्रकार बांधव म्हणाले, शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू केला आहे. मात्र, राज्यात त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अनेकवेळा समाजहितासाठी चांगल्या वाईट घटनांचे वृत्तांकन केले जाते. अशावेळी पत्रकारांची सुरक्षितता मात्र धोक्यात येते. शासनाने पत्रकारांना संरक्षण व सुरक्षितता मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे. राज्यात पत्रकारांवर हल्ले, मारहाण, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय लोकशाहीला हे घातक असून त्यातून समाजात अराजकता निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा घटनांचे कुणीही समर्थन करू नये. सत्ताधाऱ्यांनी देखील याला वेळीच पायबंद घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावीत. पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून याबाबत शासन गंभीर नाही. शासनाचे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या नियोजनाची माहिती द्यावी. अशाप्रकारच्या घटनामध्ये आरोपींना मोक्का कायदा लावण्यात यावा. या घटनेचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कायदेशिर कारवाई करावी, तसे न झाल्यास पत्रकारांच्यावतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना चिपळूण पत्रकार संघाचे नागेश पाटील, सुभाष कदम, राजेंद्र शिंदे, समीर जाधव, संदीप बांद्रे, महेंद्र कासेकर, संतोष सावर्डेकर, सुशांत कांबळे, संतोष कुळे, राजेश कांबळे, बाळू कोकाटे, अनिकेत शेलार, सुनिल दाभोळे आदी उपस्थित होते.