कँडी- श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसंकाने अफगाणिस्तानविरुद्ध आज शुक्रवारी सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने १३९ चेंडूंचा सामना करत २० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद २१० धावांची खेळी केली आहे. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी दुहेरी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पलेकल्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पथुम निसंकाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पथुम निसंकाने शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. दुहेरी शतक पूर्ण करण्यापूर्वी त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटक अखेर श्रीलंकेने ३ गडी बाद ३८१ धावा केल्या आहेत. पथुम निसंकाने दुहेरी शतक झळकावलं तर अविष्का फर्नांडोने ८८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ३ षटकार मारले. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या पथुम निसंकाने संघाला चांगली सुरुवात करून दिली. अविष्का फर्नांडो आणि पथुम निसंकाने मिळून संघासाठी १८२ धावा जोडल्या. तर कुसल मेंडिस आणि पथुम निसंकाने ४३ धावा जोडल्या. त्यानंतर पथुम निसंकाने समरविक्रमासोबत मिळून १२० धावा केल्या.