मनसेत धुसफूस, माजी आमदारपरशुराम उपरकर पक्षातून बाहेर;राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Spread the love

सिंधुदुर्ग :- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संघटनेच्या बळकटीकरणासाठी सक्रीय झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अखेर आज मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं जाहीर केले आहे.
मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटलंय की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रविण मर्गज यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं कळवले आहे. निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर उपरकर हे नाराज होते. गेल्या वर्षभरापासून परशुराम उपरकरांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा व्यासपीठावर गेले नाहीत. बैठकांना हजर राहिले नाहीत. माजी आमदार म्हणून ते मतदारसंघात कार्यरत राहिले.

काय आहे नाराजीचं कारण ?

राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कोकणासाठी मनसे संपर्क नेत्यांची घोषणा करण्यात आली. या संपर्क नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणीची निवड केली. परंतु त्यात ज्यांना बरखास्त केले होते अशांनाही संधी देण्यात आली. काहींनी मर्जीतले पदाधिकारी नेमले. त्यामुळे परशुराम उपरकर नाराज होते. यातूनच ते मनसे पक्षातून दूर होत गेले आणि आज त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही असं जाहीर करण्यात आले. यापुढच्या काळात कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा काय असेल ते ठरवू असं परशुराम उपरकर यांनी सांगितले आहे.

कोण आहेत परशुराम उपरकर ?

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा कोकणात परशुराम उपरकर हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. राणेंच्या वर्चस्वातही कोकणात शिवसेना रुजवण्याचं काम करणाऱ्या उपरकरांना बाळासाहेब ठाकरेंनी विधान परिषदेची आमदारकी दिली होती. परशुराम उपरकरांचा जिल्ह्यांत चांगला जनसंपर्क आहे. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांशी मतभेद झाले आणि उपरकरांनी राज ठाकरेंच्या मनसे पक्षात प्रवेश केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page