६०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार
ठाणे : निलेश घाग वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आणि ज्युपिटर रुग्णालय यांच्या माध्यमातून दरवर्षी ह्रदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत २-डी इको तपासणी आणि ह्रदय शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५० आणि एकूण ६०० मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या शिबिराची सुरुवात रविवारी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथे करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत राज्यभरातील ज्या लहान बालकांना हृदयाशी सबंधित व्याधी तसेच हृदयाला छिद्र आहे अशा मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर रुग्णालय आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असतो. यंदाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने रविवारी ज्युपिटर रुग्णालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान बालकांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या असून लहान बालकांना निरोगी आयुष्य लाभले आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने गरजू बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. यावर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५० आणि एकूण ६०० मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थित रविवारी या शिबिराच्या कार्यक्रमावेळी या लहान बालकांच्या तपासणी आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आज या प्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह ज्युपिटर रुग्णालयाचे विविध मान्यवर डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जाहिरात