भाजपा नेते, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्वात प्रशाकीय अधिकाऱ्यांची पहाणी.
मंगळवार | फेब्रुवारी ०६, २०२४.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कासे येथे सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामात ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि कमालीच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. ठेकेदार प्रमोद महाडिक हे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाही जुमानत नाहीत; ना ग्रामसभेत उपस्थित राहून ग्रामस्थांना उत्तरे देत. अशात कासे गावातील काम घेऊन ठेकेदार गावावर उपकार करत आहेत का अशा उद्विग्न प्रतिक्रिया घेऊन ग्रामस्थ मंडळींनी सरपंच श्री. जगन्नाथ राऊत व उपसरपंच श्री. जनार्दन कातकर यांच्यासोबत देवरुख येथे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली.
श्री. अधटराव यांनी विस्तृतपणे माहिती घेत उपअभियंता लठाड साहेब व सहायक अभियंता इंदुलकर यांच्याबरोबर कासे येथील काम सुरु असलेल्या स्थळी भेट दिली. आत्तापर्यंत ग्रॅव्हिटीने गावाला सुरळीतपणे होणारा पाणीपुरवठा चालूच ठेऊन काम करणे अपेक्षित होते. मात्र कामाला सुरुवात करतानाच या जलवाहिन्या बंद करण्यात आल्या. परिणामी गावात पाणीपुरवठा बंद आहे. शिवाय स्त्रोताच्या ठिकाणीच काम सुरु असल्याने सर्व पाणी गढूळ झाले असून लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे.
बंधाऱ्याचे काम जवळपास दीड फुट उंचीचे झाले असून ते इतके निकृष्ट दर्जाचे आहे की, बंधाऱ्याच्या खालून पाणी वाहून चालले आहे. प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी संपन्न झालेली ग्रामसभा दु. १२ ते सायं. ८ वाजेपर्यंत चालली. या सभेसाठीही ठेकेदार अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. असा बेजबाबदार कंत्राटदाराकडे जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल २८ कामे असून कासे गावात त्यांनी शासनाचा पैसा अक्षरशः पाण्यात दवडला आहे.
याबाबत बोलताना अधटराव म्हणाले, “पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यांतील माता-भगिनींना शुद्ध पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन ‘जलजीवन मिशन’ योजना कार्यान्वित केली. मात्र कोकणात काही स्वार्थी राजकारण्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत या योजनेसाहित लाभार्थ्यांना अक्षरशः ओरबाडले आहे. कासे गाव हे समोर आलेले एक उदाहरण आहे. अशी कित्येक गावे ठेकेदार आणि संधिसाधू राजकारण्यांच्या हातमिळवणीमुळे वेठीस धरली गेली असतील ते समोर येईलच. त्यामुळे येत्या काळात हा भ्रष्टाचार खोदून काढून चिपळूण-संगमेश्वर विधानसभेतील नागरिकांना चिंतामुक्त करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”