रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर धावणारी निजामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस गेले काही दिवस तब्बल दहा तासापेक्षा अधिक उशिराने धावत आहे.
उत्तरेकडील थंडी आणि धुक्याचा जोर वाढल्यामुळे या गाडीच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर निजामुद्दीन येथून मंगला एक्स्प्रेस सुटल्यानंतर ती रत्नागिरी नंतर कणकवली रेल्वे स्थानकात थांबते. येथील स्थानकात नियमितपणे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी ती दाखल होते.
परंतु, अलीकडच्या कालावधीत ही गाडी रात्री अनियमित वेळेत येताना दिसत आहे. तब्बल नऊ ते दहा तास ही गाडी उशिराने धावत आहे. गेले काही दिवस हा परिणाम वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.