उज्जैन- मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक खळबळजनक बातमी समोर आली असून दरोडा टाकल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. उज्जैनच्या देवास रोडवर असलेल्या पिपलोडा गावात ही घटना घडली. रामनिवास कुमावत असे मृताचे नाव आहे.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपलोडा द्वारकाधीश गावात राहणारे माजी सरपंच आणि भाजप मंडल अध्यक्ष रामनिवास कुमावत (वय 70 वर्षे) हे पत्नी मुन्नी कुमावतसोबत राहत होते. पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करून दोघांची धारदार शस्त्राने हत्या केली.
दरम्यान, रामनिवा यांचा मुलगा देवास शहरात राहतो तर मुलीचं लग्न झालं आहे. दरम्यान ते रोज मॉर्निंग वॉकसाठी जात असत, मात्र आज ते न दिसल्याने गावात राहणाऱ्या त्यांच्या मेव्हण्याने घर गाठले आणि आत जाऊन पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांची बहीण आणि रामनिवास कुमावत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले असता तपासात दरोडा, लुटारू आणि खुनाचा संशय बळावला.