टीम इंडियाने पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळही आपल्याच नावावर केला आहे. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी समाधानकारक खेळी केली.
हैदराबाद- टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसही आपल्याच नावावर केला. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 110 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 421 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने 175 धावांची आघाडी घेतली आहे. तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल ही जोडी नाबाद परतली आहे. अक्षर पटेल याने 62 बॉलमध्ये नाबाद 35 धावा केल्या आहेत. तर रवींद्र जडेजा 155 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 81 धावा करुन परतला आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात…
इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांवर गुंडाळल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. रोहित 24 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीने शुबमन गिल याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 39 धावांची नाबाद भागीदारी केली. टीम इंडियाने पहिल्या दिवसापर्यंत 1 विकेट गमावून 119 धावा केल्या. टीम इंडिया 127 धावांनी पिछाडीवर होती. तर यशस्वी आणि शुबमन 76 आणि गिल 14 धावांवर नाबाद होते.
यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने 1 बाद 119 या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. मात्र लगेचच टीम इंडियाने विकेट गमावली. जो रुट याने यशस्वीला 4 धावांनंतर आऊट केलं. यशस्वी 80 धावांवर आऊट झाला. दोघांमध्ये फक्त 43 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर टीम इंडियाने काही अंतराने विकेट टाकायला सुरुवात केली. शुबमन याने 23 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. श्रेयस अय्यर35 धावा करुन आऊट झाला. केएलने एक बाजू लावून धरली होती. केएल शतकाच्या जवळ आला होता. मात्र केएलकडून चूक झाली. केएल 86 धावांवर आऊट झाला.
केएलनंतर श्रीकर भरत याला अपेक्षित सुरुवात मिळाली होती. श्रीकर सेट झाला होता. मात्र श्रीकरला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. श्रीकर 41 धावांवर बाद झाला. श्रीकरनंतर आर अश्विन धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 90/3 ओव्हरमध्ये 7 बाद 358 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर जडेजा आणि अक्षरने टीम इंडियाचा डाव सावरला. जडेजा आणि अक्षर या दोघांनी आठव्या विकेटसाठी 117 बॉलमध्ये 63 धावा केल्या.
इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. इंग्लंडकडून आतापर्यंत टॉम हार्टली आणि जो रुट या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्यात. तर जॅक लीच आणि रेहान अहमद या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. आता तिसऱ्या दिवस या कसोटी सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. आता टीम इंडियाची तिसऱ्या दिवशी कशी ‘रन’निती असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेलच.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन-
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.